मेलबर्न – स्पेनचा स्टार खेळाडू व तब्बल 20 वेळा ग्रॅंड स्लॅंम स्पर्धा जिंकणाऱ्या राफेल नदालला यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे. त्याने मंगळवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या डेनिस शापोव्हालोव्हचे आव्हान मोडून काढताना तब्बल चार तास आठ मिनिटे चाललेल्या लढतीत 6-3, 6-4, 4-6, 3-6, 6-3 असा पाच सेटमध्ये पराभव केला.
या विजयासह त्याने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश काल आहे. आता त्याने या फेरीत तसेच त्यानंतर अंतिम फेरीत विजय मिळवला तर, त्याला 21 विक्रमी ग्रॅंडस्लॅम पटकावण्याची संधी आहे. ही स्पर्धा यंदा जिंकली तर अशी कामगिरी करणारा नदाल ऐतिहासिक 21 ग्रॅंड स्लॅम जिंकणारा इतिहासातील पहिला टेनिसपटू ठरणार आहे.
दरम्यान, महिलांच्या ऐकेरीत यजमान ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीनेही उपांत्य फेरी गाठली. तीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या जेसीका पेगुलावर 6-2, 6-0 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. अन्य लढतीत अमेरिकेच्या मेडीसन केजनेही यंदाच्या स्पर्धेत सनसनाटी निकाल देताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. तीने उपांत्यपूर्व फेरीत चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेझीकोव्हाचा 6-3, 6-2 असा पराभव केला.