मेलबर्न – ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धांतील मोसमातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनचा मानांकित टेनिसपटू राफेल नदालने शुक्रवारी अंतिम फेरीत प्रवेश केला. आता 21 व्या विक्रमी ग्रॅंडस्लॅम विजेतपदापासून तो केवळ एक पाऊल दूर आहे. विजेतेपदासाठी त्याची लढत रशियाच्या डॅनियल मेदवेदेव याच्याशी होणार आहे.
नदालने स्पर्धेची सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. नदालने ही स्पर्धा यंदा जिंकली तर तो 21 ग्रॅंडस्लॅम जिंकणारा टेनिस जगतातील पहिलाच पुरुष खेळाडू ठरणार आहे. नदालने उपांत्य फेरीच्या सामन्यात ईटलीच्या मॅटो बेरेटिनीचा 6-3, 6-2, 3-6, 6-3 असा चार सेटमध्ये पराभव केला.
अर्थात बेरेटीनीने तिसरा सेट जिंकत नदालला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचा अनुभव कमी पडला. तसेच त्याच्याकडून झालेले डबल फॉल्ट व टाळता येणाऱ्या चुका झाल्या व तेच नदालच्या पथ्यावर पडले. या स्पर्धेत रॉजर फेडरर, नोवाक जोकोवीच असे मानांकित खेळाडू खेळत नसल्यामुळे नदाललाच संभाव्य विजेता मानले जात आहे.
दुसऱ्या उपांत्य लढतीत रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने ग्रीसच्या स्टोफानोस त्सित्सिपासचा 7-6, 4-6, 6-4, 6-1 असा चार सेटमध्ये पराभव केला व अंतिम फेरी गाठली.