मेलबर्न – स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटाचे रविवारी विजेतेपद पटकावले. हे त्याचे विक्रमी 21 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले असून, अशी कामगिरी करणारा नदाल हा जागतिक टेनिसमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने अंतिम लढतीत रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा पाच सेटमध्ये पराभव केला.
मेदवेदेव विरुद्धच्या या अंतिम लढतीत नदालने पहिले दोन सेट गमावल्यावर मेदवेदेव हा सामना सहज जिंकेल असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, आपली जिद्द व अनुभव आणि सर्वात महत्त्वाची ठरलेली तंदुरुस्ती नदालने सिद्ध केली. त्याने नंतरचे तीनही सेट जिंकत सामन्यासह विजेतेपदही पटकावले.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची ही पाच सेटपर्यंत रंगलेली रोमहर्षक लढत नदालने 2-6, 6-7 (5-7), 6-4, 6-4, 7-5 अशी जिंकली व 21 ग्रॅंडस्लॅम जिंकणारा टेनिस जगतातील पहिलाच खेळाडू ठरला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, विम्बल्डन व फ्रेंच ओपन अशा चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी 2 वेळा जिंकणारा चौथा खेळाडू ठरला. मेदवेदेवने पहिला सेट 6-2 असा सहज जिंकत आघाडी घेतली. मेदवेदेवने दुसऱ्या सेटमध्येही नदालचा प्रतिकार मोडून काढताना हा सेटही खिशात टाकला. त्यावेळी नदाल पुन्हा एकदा या स्पर्धेत अपयशी ठरणार असेच वाटत होते. मात्र, त्याने दमदार पुनरागमन करत तिसरा सेट जिंकला.
त्याचवेळी मेदवेदेवही काहीसा संथ झाला होता व त्याचाच पुरेपूर लाभ घेत नदालने त्याची तंदुरुस्तीची कसोटी सिद्ध करत चौथा सेट जिंकत सामन्यात बरोबरी केली. पाचव्या सेटमध्ये नदाल व मेदवेदेव यांच्यात प्रत्येक गेममध्ये बरोबरी होत होती व सामन्याचे पारडे सतत दोन्ही खेळाडूंकडे झुकत होते.
तिसऱ्या गेममध्ये नदालने मेदवेदेवची सर्व्हिस ब्रेक केली 3-2 व नंतर 5-3 अशी आघाडी घेतली. मेदवेदेवनेही हार न मानता दमदार पुनरागमन करत 5-5 अशी बरोबरी साधली. अनुभवाच्या जोरावर नदालने मेदवेदेवला चुका करण्यास भाग पाडले व हा निर्णयाक सेट 7-5 असा जिंकत 21 वे ग्रॅंडस्लॅम मिळवण्याचा इतिहास रचला.