औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील नारेगाव परिसरात मैत्रिणीला घरी बोलावून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कृत्य रुम पार्टनर मित्र कामावर गेल्यावर करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळातच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
रेणुका देविदास ढेपे, वय 20 असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे तर शंकर हागवणे असे संशयीत तरुणाचे नाव आहे. शंकर हा मुळचा वाशिम जिल्ह्यातील असून तो घटनेनंतर फरार झाला आहे. त्याचे रुम पार्टनर कामावरून परत आल्यानंतर त्यांना आपल्या खोलीत रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरचा शहरात भाजी विक्राचा व्यवसाय आहे. तो शहरातील नारेगाव परिसरात चार मित्रांसह भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आणि रेणुकाची काही महिन्यांपासूनची ओळख होती. ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार, रेणुका नेहमी शंकरच्याखोलीवर यायची. हत्येच्या दिवशी ती शंकरला भेटायला आली होती. त्यावेळी त्याचे मित्र कामावर गेले होते. त्यानंतर शंकर आणि रेणुका हे दोघेच खोलीत होते. कंपनी सुटल्यानंतर सायंकाळी पाच वाजता इतर मित्रखोलीवर आले तर त्यांना खोलीत जाताच रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी लगेच यासंदर्भात घरमालक बंगाळे यांना माहिती दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.