मुंबई – अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanwilkar) अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षक वर्गात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या सौंदर्याने तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अमृताने स्वत:चे एक युट्यूब चॅनेल देखील सुरू केले आहे. यासाठी तिने ‘तिकीट टू महाराष्ट्र’ ही सीरिज सुरू केली आहे. याद्वारे महाराष्ट्रातील विविध भागाला भेट देत तेथील परंपरा, संस्कृती, निसर्गरम्य जागांचं महत्त्व याबाबत माहिती देत आहे.
आतापर्यंत तिने नाशिक, पुणे, कोल्हापूर या शहरांची नव्याने ओळख करून दिली आहे. मात्र एका व्हिडिओवर नेटकऱ्याने केलेल्या कमेंटला अमृताने सडेतोड उत्तर दिले आहे. अमृताच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने “काम मिळेना वाटतं आंटीला.”, अशी कमेंट केली होती. या कमेंटवर प्रत्युत्तर देत अमृताने त्या नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे.
अमृता प्रत्युत्तर देत म्हणाली की, “अहो आजोबा हे कामच आहे. हा प्रवासाशी संबंधित असणारा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. अच्छा, तुमच्या काळात हे युट्यूब वगैरे नसेल ना? म्हणून तुम्हाला या सोशल मीडियाच्या ताकदिची कल्पना नसेल. हरकत नाही.” अनेकदा अमृता ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते.
दरम्यान ‘वाजले की बारा’ या गाण्यामुळे अमृता खानविलकरला मोठी लोकप्रियता मिळाली. नुकतेच तिने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात काम केले. याशिवाय तिने ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’, ‘फूंक’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. लवकरच ती ‘कलावती’ चित्रपटात आणि ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये पाहायला मिळणार आहे.