Mirzapur Bus Accident: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना हलिया सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना लालगंज सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बस मिर्झापूरवरून मतवारला जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला. पोलीस अधीक्षक अभिनंदनचे जनसंपर्क अधिकारी यांनी या अपघाताची माहिती दिली. मिर्झापूर येथील संत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांची वाहतूक करणारी खासगी बस उलटली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण जखमी झाले आहेत.
अपघाताविषयी सांगताना त्यांनी,’बसमध्ये एकूण 31 जण प्रवास करत होते. बस हलिया दादरी रोडच्या दादरी बंधा वळणावर येताच वेग जास्त असल्याने ती नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी होऊन रस्त्याच्या कडेला आली. त्यामुळे यातील प्रवासी जखमी झाले. प्रवाशांचा आक्रोश ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
डीएम प्रियंका निरंजन म्हणतात, “ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना हलिया सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.” गंभीर जखमींना लालगंज सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बस ओव्हरलोड असल्याचे सांगण्यात येत आहे. संतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दादरी बंधा गावाजवळ ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.