डॉ. जाधव यांच्यावर जबाबदारी : अतिरिक्त आयुक्तांना देणार अहवाल
पिंपरी – करोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांची शहरातील खासगी रग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. याबाबत राज्य सरकारकडे अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने, महापालिका प्रशासनाने या रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार चौकशी व तपासणी समितीचे कामकाज याच विषयाशी संबंधित आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत, महापालिका स्तरावर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
दरम्यान, काही खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या करोनाबाधितांवरील उपचारापोटी लाखो रुपयांची बिले आकरली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयातील बिले परवडेनाशी झाली आहेत. लाखो रुपयांची बिले आकारल्याच्या शेकडो तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी भारतीय राजस्व सेवेतील आयकर विभागाचे सह आयुक्त एन. अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीच्या कामकाजाला महापालिकेच्या वैद्यकीय व लेखापरीक्षण विभागातील अधिकारी सहाय्य करत आहेत.
या समितीने थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सिटी केअर हॉस्पिटल व स्टार मल्टीस्पेशालिटी या रुग्णालयांना भेट दिली. या भेटीदरम्यान विहित दराव्यतिरिक्त अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जाते. ही बिल आकारणी योग्य नसल्याने, या रुग्णालयाच्या प्रमुखांना समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिका प्रशासनाने करोनाबाधित रुग्णांची वैद्यकीय बिले मंजुरीबाबत अभिप्राय नोंदविणे, बिलामध्ये कोणत्या बाबी अंतर्भूत कराव्यात, याचे संपूर्ण कामकाज करण्यासाठी वायसीएमचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लेखाधिकारी किशोर शिंगे व नियुक्त केलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी डॉ. जाधव यांना मदत करायची आहे. मुख्यलेखापरीक्षकांच्या संपर्कात राहून, त्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्त -1 यांना सादर करावयाचा आहे.
30 हून अधिक रुग्णालयांत उपचार सुरू
रुग्णांची वाढती संख्या व मृत्युदराचा विचार करता, राज्य सरकारच्या निर्देशानुसार, खासगी व धर्मदाय रुग्णालयांमध्येदेखील करोनाबाधितांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची शहरातील संख्या 30 वर पोहोचली आहे.