चाकणमध्ये संग्रामदुर्ग या प्राचीन किल्ल्याच्या सानिध्यात चक्रेश्वर हे पौराणिक वारसा असलेले शिवमंदिर वसले आहेत. दशरथ राजा शिकारीला जाताना रथाचे चक्र या भूमीवर अडकले ते काढण्यासाठी खोदताना शस्त्राचा घाव लागून तिथे रक्त उडू लागले. अधिक खोदताच एक महाकाय शिवलिंग सापडले. कैकयी राणीने चक्र काढण्यासाठी मदत केली. तिने दशरथ राजाकडून भरताला राज्याभिषेक आणि रामाला चौदा वर्ष वनवास असे दोन वर कालांतराने मागून घेतले. इथे रथाचे एक चाक अडकले म्हणून या नगरीला एकचक्र नगरी व आता चाकण म्हणतात. तसेच येथील महादेवाला चक्रेश्वर म्हणतात. हिरव्या वनराजीत हे शिवमंदिर वसले आहे.
भव्य कमानीतून प्रवेशल्यावर गुलाबी जांभळ्या रंगसंगतीतील हे सुंदर मंदिर लक्ष वेधून घेते. शिवकुंड नामक पुष्करणीच्या जलदर्पणात ते आपले सुंदर प्रतिबिंब निरखत आहे असेच भासते. या पुष्करणीत स्नानासाठी उतरण्यासाठी चहूबाजूनी पायऱ्या आहेत. पूर्वी इथे 12 वर्षांतून एकदा गंगामाई अवतरत असे. या तीर्थकुंडात स्नान केल्यानंतर अंगावरील भद्र, कोड नाहीसे होते, अशी श्रद्धा असल्याने स्नानासाठी भाविक येतात.
पाषाणातील या मंदिराचे आता नूतनीकरण करण्यात आले आहे. तरीही वराह, नंदी, कासव, लाकडी नगारखाना असे अवशेष जपलेले दिसतात. मंदिराच्या लाकडी नंदीमंडपात संगमरवरी नंदी आहे. गर्भगृहात गणेशमूर्ती आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे सहा फूट लांबीचे भव्य आणि सुंदर शिवलिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगांपेक्षाही हे शिवलिंग आकाराने मोठे आहे. याच परिसरात शांडिल्य ऋषींचे समाधी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि सुंदर बगीचा आहे. अशा रम्य परिसरात चित्त शांतीचा सुखद अनुभव येतो.
– माधुरी शिवाजी विधाटे