- आगीच्या घटनेनंतर लिलाव प्रक्रियेला आली गती
पिंपरी – मोशी येथील पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव मार्च अखेर पर्यंत केला जाईल, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नुकतीच कार्यालयातील जप्त वाहनांना आग लागल्याने लिलाव प्रक्रियेला गती मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाकडून विविध कारणांमुळे वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
ही वाहने मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरामध्ये पार्क करण्यात आल्या आहेत. यामध्ये खासगी बस, स्कूल बस, चारचाकी, ट्रक , टॅम्पो व तीन चाकी रिक्षांचा समावेश आहे. आजघडीला आरटीओ परिसरात अशी 159 वाहने आहेत. नुकतीच पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या जप्त वाहनांना आग लागली होती. यामध्ये दोन ट्रॅव्हल्स बसचे मोठे नुकसान झाले होते. तसेच अन्य काही वाहनांचे देखील आगीमुळे नुकसान झाले होते. त्यानंतर या वाहनांच्या लिलाव प्रक्रियेला वेग आला असून कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करुन मार्च अखेरपर्यंत लिलाव पूर्ण करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले आहे.