नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी राज्यसभेतून १२ खासदारांचे निलंबन केले होते. त्यावरून संसदेच्या समोर या खासदारांनी धरणे आंदोलन देखील केले. दरम्यान, यासर्व परिस्थतीमध्ये उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या नातीच्या लग्नाच्या रिसेप्शनला या सर्व निलंबित खासदारांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.
उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. वैंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापतीदेखील आहेत. उपस्थिती लावणाऱ्यांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सरन्यायाधीश रमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांचा समावेश होता.
निलंबित खासदारांनी रिसेप्शनला उपस्थिती लावल्याने मात्र आश्चर्य व्यक्त होत होते. कारण वैंकय्या नायडू यांनीच त्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. निलंबित खासदार यावेळी फोटोंसाठीही एकत्र येताना दिसले.
शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, सीपीएमचे एलामारन करीम, सीपीआयचे विश्वम आणि डोला सेन, तृणमूल काँग्रेसच्या शांता छेत्री यांचं राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसच्याही सहा खासदारांचा समावेश आहे. खासदारांचं निलंबन करण्यात आल्यापासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून संसदेबाहेर गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली जात आहेत.