शाहजानपूर – उत्तर प्रदेशातील शहजानपूर येथे एका युवतीवर सामुहिक बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यांनंतर तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही युवती गंभीर भाजलेल्या अवस्थेत राष्ट्रीय महामार्गावर आढळली होती.
रायखेडा गावाजवळ तीन जणांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी संतापून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले, असे या युवतीने तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे पोलीस अधीक्षक एस. आनंद यांनी सांगितले.
बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या या युवतीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी लखनऊला नेण्यात आले. मात्र ही युवती आपले जबाब सातत्याने बदलत आहे. कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून हॉस्पिटलपर्यंत कसे आलो, याची आपल्याला कल्पना नसल्याचेही ही युवती सांगत आहे.
भारतीय जनता पक्षाचे बलात्काराचा आरोप झालेले माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयात ही युवती शिकते. या महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही युवती एकटीच तिसऱ्या मजल्यावरून खाली येताना दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये महाविद्यालयाच्या आवारातून सीमाभींतीच्या पडलेल्या भागातून ती बाहेर जात असताना दिसत आहे. महाविद्यालयात आल्यानंतर 20 मिनिटांनी ती बाहेर पडली आहे. त्यानंतर कालव्याच्या रस्त्याने ती एकटीच जाताना दिसत आहे, असे आनंद यांनी स्पष्ट केले. त्यापुर्वी ही पीडिता वर्गाच्या बाहेर तिच्या मित्राशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर ती ग्रंथालयातही गेली होती, असे ते म्हणाले.
पोलिस उपअधिक्षकांच्या नेतृत्वाखाली याचा तपास करण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय विशेष कृती गटही नेमण्यात आला आहे. या मुलीवर उपचार सुरू असणाऱ्या एसपीएम शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे उपअधिक्षकांसह पाच जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या घटनेत ती 72 टक्के भाजली आहे.
या मुलीचा जबाब घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्यात येईल, असे अधिक्षकांनी सांगितले. या प्रकरणात तिच्या मित्रांसह सुमारे एक डझन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे. या युवतीने ही घटना घडली त्या दिवशी गावातील एका व्यक्तीशी मोबाईलवर संपर्क साधला होता. त्याचीही चौकशी करण्यात आली आहे.
ही युवती नग्नावस्थेत सापडली होती. पोलिसांना बोलवेपर्यंत आम्ही तिचे शरीर स्टोलने झाकले होते, असे या गावातील रहिवासी असीफ अली यांनी सांगितले. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ही युवती ज्या शेतात सापडली तेथे काही डबडी सापडली आहेत. मात्र त्यात दारू असल्याचे आढळले नाही.
ही युवती जलालाबाद गावातील रहिवासी आहे. स्वामी सुखदेवानंद पदव्युत्तर महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे.