सेऊल, – उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया दरम्यानच्या सागरी सीमेवर दोन्ही देशांकडून अगदी बारीक देखरेख केली जात असते. ही गस्त चुकवून एका बहाद्दराने समुद्राच्या पाण्यातून उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात घुसखोरी करण्याचा प्रयत्न नुकताच फसला. तब्बल 6 तास पाण्याखालून पोहत जाऊन त्याने दक्षिण कोरियाचा समुद्रकिनारा गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रवासादरम्यान त्याला झोप अनावर झाल्याने तो पकडला गेला.
सीसीटिव्हीमध्ये त्याला वारंवार बघितले गेले होते. तरीही या घुसखोराच्या या वेड्या धाडसाबाबत दक्षिण कोरियाया अधिकाऱ्यांना थांगपत्ताही लागला नव्हता. तो किनाऱ्यावर आला तेंव्हाच त्याच्या घुसखोरीची माहिती मिळाली. किनाऱ्यावर हा पठ्ठ्या आला असल्याचे लक्षात आल्यानंतरही तीन तासांपर्यंत त्याला पकडले गेले नव्हते. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनी आणि विरोधकांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षण व्यवस्थेवर जोरदार ताशेरे ओढले.
डायव्हिंग गीअरच्या आधारे या माणसाने दोन्ही देशांदरम्यानच्या “डिमिलीटराईज्ड झोन’मधून समुद्राच्या पाण्याखालून हा प्रवास केला होता. जेमतेम 20 वर्षांचा हा युवक पूर्व किनारपट्टीवरील गोसेंग शहराच्या उत्तरेस किनाऱ्यावर आला. डायव्हिंग सूटमध्ये असलेल्या पॅडल्ड जॅकेट घालून तो जवळपास 6 तास पाण्याखालून पोहत होता. त्याच्या या पोशाखामुळेच त्याला थंड पाण्यातही उब मिळाली होती.
किनारपट्टीवरील काटेरी कुंपण ओलांडताना त्याने आपल्या जवळील सर्व साहित्य फेकून दिले होते. किनाऱ्यावरील सीसीटिव्हीमध्ये तो 8 वेळा दिसला. दोन वेळेला अलार्मही वाजले पण सीमेवरील रक्षकांना तो सापडला नाही. तीन तासांनंतर तो एका झाडाखाली झोपलेला आढळला आणि पकडला गेला.