- केंद्रीय मंत्री जावडेकरांच्या हस्ते सोडत
- उपमुख्यमंत्री पवारही राहणार उपस्थित
पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाच्या श्रेयवादाच्या लढाईत गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेल्या स्वस्त घरांच्या सोडतीला अखेर मूहर्त मिळाला आहे. या सोडतीकडे शहरातील हजारो गरीब नागरिकांच्या लक्ष होते. अखेर शनिवारी (दि. 27) केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी अकरा वाजता घेण्यात येणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात 11 जानेवारी रोजी 3 हजार 664 घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमासाठी बोलवताना राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. ही सोडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काढण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ऐनवेळी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यक्रम रद्द करण्याची भूमिका घेतली. त्यांनंतर केंद्रीय मंत्र्यांच्या वेळेची जुळवाजुळव सुरू असल्याने या सोडतीला उशीर झाला. अखेर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वेळ दिल्याने ही सोडत शनिवारी होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे, तर विशेष उपस्थिती म्हणून खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रधानंमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी 47 हजार 878 इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 47 हजार 707 अर्ज पात्र ठरलेले आहेत. प्रकल्पाच्या अंतर्गत चऱ्होली 1442, रावेत 934 व बोऱ्हाडेवाडी 1288 अशा एकूण 3664 सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.
नागरिकांनी उपस्थित न राहण्याचे आवाहन
याबाबत बोलताना पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ही सोडत महापालिकेच्या फेसबुक पेज व संकेतस्थळावर ऑनलाइन दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी गर्दी करू नये. करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.