बरेली – शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’च्या विरोधात देशाच्या विविध भागांत निदर्शने सुरू आहेत. यादरम्यान, उत्तरप्रदेशच्या बरेली येथील एका मॉलमध्ये जोरदार गोंधळ उडाला आहे. पठाण चित्रपटाचे समर्थक आणि विरोधकांचे गट एकमेकांना भिडले असून त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे. येथिल फिनिक्स मॉलमध्ये ही घटना घडली आहे. दोन गटात भीषण हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. यादरम्यानच्या हाणामारीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत 5 जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तरप्रदेशातील इज्जत नगर पोलिस स्टेशनच्या फिनिक्स मॉलमध्ये घडली आहे. चित्रपट पाहणाऱ्यांनी सांगितले की, चित्रपट सुरु असताना दिपीका पादुकोनच्या भगवा बिकिनीवरून दोन गटात वाद सुरु झाला. यादरम्यान दोन्ही गटात जोरदार हाणामारी देखील झाली. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हाणामारीत पाच जण जखमी देखील झाले असून त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, पठाण चित्रपटाने बाॅक्सऑफिसवर मोठी कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. काही वाद वगळता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी तिकिट बुकिंग केले आहे. तर आज 26 जानेवारीनिमित्त सुट्टी असल्यामुळे अनेक ठिकाणची चित्रपटगृहे हाऊसफूल होती.