श्रीगोंदा,(प्रतिनिधी) – शहरातील खेडकर मळ्यात सोमवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी चोरी केली. या चोरीत तीन लाख ७० हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने, असा मुद्देमाल लंपास झाला आहे.शहरातील मध्यवस्तीत ही चोरी झाल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे.
योगेश भानुदास खेडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. भानुदास खेडकर रात्री त्यांच्या घराच्या हॉलमध्ये झोपले होते. त्यांचा मुलगा शेजारच्या रूममध्ये झोपला होता. खेडकर कुटुंबीय साखर झोपेत असतानाच चोरटे घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा तोडून स्वयंपाक घरातून आत आले. आतील एका खोलीतील कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
झोपेतून उठल्यानंतर खेडकर यांना त्यांच्या घरात उचकापाचक झाल्याचे व स्वयंपाकाचा दरवाजा तोडल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपाथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आले होते. या श्वानाने घरापासून जवळ काही अंतरापर्यंत माग काढला. दरम्यान, शहरात एवढी मोठी धाडसी चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे आहे.
पोलीस तपासणार ‘सीसीटीव्ही’
कालच खेडकर यांनी कांदे विकले होते. त्या पट्टीची रोख रक्कम आणून त्यांनी घरात ठेवली होती. रक्कम ठेवलेल्या खोलीत चोरांनी प्रवेश करून रक्कम चोरल्याने चोर माहितगार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, ही चोरी खेडकर यांच्या ट्रॅक्टरमधील साहित्याच्या मदतीने केल्याने पोलीस आसपासचे ‘सीसीटीव्ही’ तपासणार असल्याचे समजते.