बारामती शहरातील बंद घरे फोडून चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला शहर पोलिसांनी जेरबंद केले. अटक आरोपी कडून तब्बल ७ लाख २० हजार ३०० रुपये किमतीचे १७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. लोकेश रावसाहेब सुतार (वय २८ वर्षे रा.लिंगनूर ता.मिरज जि.सांगली) असे अट्टल चोरट्याचे नाव आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून बंद घरे फोडून चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहर पोलिसांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तपास पथक तयार केले. सदर पथकाने कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या लोकेश सुतार यास ताबा वॉरंटने बारामतीत आणून चौकशी केली असता त्याचा साथीदार संदीप यशवंत पाटील (लिंगनूर ता.मिरज जि.सांगली) याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस संदीप पाटील याचा शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार अभिजित कांबळे, संजय जाधव, संजय जगदाळे, रामचंद्र शिंदे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, अंकुश दळवी, रणजित देवकर, दशरथ इंगोले, अजित राऊत यांनी केली.