औरंगाबाद – लोकपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर काही लोकांनी आज हल्ला केला. लोकपत्रच्या कार्यालयात जाऊन हा हल्ला करण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यावर लिहिलेल्या लेखामुळे हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत असून राणे यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं समजतं.
यावेळी संपादक रविंद्र तहकीक यांना काळं फासण्यात आलं. तसेच कार्यालयात गोंधळ घालण्यात आला. नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आऱोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
‘शेंदाड नाऱ्याचा भयताड पोऱ्या गांजा मारतोय की चपट्या कोऱ्या’ या मथळ्याखाली ‘लोकपत्र’मध्ये लेख छापून आला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
पत्रकार रवींद्र तहकीक यांनी लेखात नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर भाष्य केलं. तसेच नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विश्लेषण केलं होतं. मात्र हे वादग्रस्त असल्याचा आऱोप करत राणे यांच्या समर्थकांकडून लोकपत्रच्या कार्यालयात गोंधळ घालण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.