तुमच्याविरुद्ध खटल्याचा प्रस्ताव का दाखल करु नये!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला नोटीस

पिंपरी – पवना नदीपात्रातील प्रदुषणामुळे मासे व कासव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेला नोटीस बजावली आहे. तुमच्याविरूद्ध खटल्याचा प्रस्ताव का दाखल करू नये, असे त्यामध्ये म्हटले आहे. तसेच, याबाबत महापालिकेला येत्या दहा दिवसांत याबाबत करणार असलेल्या कार्यवाहीचा कृती आराखडा (ऍक्‍शन प्लॅन) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नदीत मासे व कासवाच्या मृत्यूनंतर महापौर माई ढोरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर आगपाखड केली होती. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला धारेवर धरले आहे. एकंदरीत पवना प्रदूषण हे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये वादाचा मुद्दा ठरु लागला आहे.

पवना नदीपात्रात बुधवारी (दि. 4) अनेक मासे व एका कासवाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. पवना नदीवरील केजूदेवी बंधारा आणि ताथवडे स्मशानभूमीजवळील नदीपात्रात मासे तर, ताथवडे स्मशानभूमीजवळ कासव मृत झाल्याचे आढळले होते. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली होती. त्यांनी याबाबत महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार, संबंधितांनी गुरुवारी सकाळी प्रत्यक्ष पवना नदीपात्राची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पवना नदीपात्रात मिसळणाऱ्या चार नाल्यांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तसेच, मृत माशाचाही नमुना घेतला होता. हे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविलेले आहेत. दरम्यान, “एमपीसीबी’कडून महापालिकेला सोमवारीच (दि. 9) याबाबत नोटीस बजावली असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस यांनी दिली. महापालिकेविरूद्ध याप्रकरणी खटल्याचा प्रस्ताव का दाखल करू नये, असे या नोटीशीत म्हटले आहे. तसेच, पवना नदी प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिका काय कार्यवाही करणार, याबाबतचा “ऍक्‍शन प्लॅन’ दहा दिवसांत मागविला आहे. यापूर्वीही पालिकेला अशीच नोटीस बजाविण्यात आली होती.

बॅंक गॅरंटीही दिली नाही

पवना नदीमध्ये 4 नाल्यांमधून प्रक्रिया न करता घरगुती सांडपाणी सोडण्यात येत आहे. थेरगाव, ताथवडे विभागातील नाले नदीपात्रात थेट मिसळत आहेत. प्रक्रिया न करता हे पाणी सोडले जात आहे. केजूदेवी बंधाऱ्याजवळ पवना नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळू नये, यासाठी महापालिकेने संबंधित नाले मैलाशुद्धीकरण केंद्राकडे वळविणे अपेक्षित आहे. त्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. महापालिकेच्या रावेत येथील मैलाशुद्धीकरण केंद्राचे काम व्यवस्थित सुरू नसल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेला नदी प्रदुषणाबाबत यापूर्वी बजावलेल्या नोटीसमध्ये पाच लाख रुपयांची बॅंक गॅरंटी मागितली होती. ती देखील दिलेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेता आपणाविरूद्ध खटल्याचा प्रस्ताव का दाखल करू नये, अशी नोटीस महापालिकेला बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटीस अद्याप बघितलेली नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही. संबंधित नोटीस पाहिल्यानंतरच याबाबत बोलता येईल. महापालिकेला यापूर्वी बजावलेल्या नोटीसीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे बॅंक गॅरंटीचा उल्लेख नव्हता. त्यांनी पवना नदी प्रदुषणाबाबत काय कार्यवाही करणार याविषयी विचारणा केली होती. त्यानुसार महापालिकेतर्फे अहवाल सादर केला होता.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता, महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.