पुणे – जुन्या वादातून गोट्या नावाच्या व्यक्तीला भेटल्याने छोट्या ऊर्फ अभिषेक अलटेने एकावर धारदार शस्त्राने वार केले. गणेश ठाकुर (वय 25, रा. बिबवेवाडी) असे वार केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या हल्ल्यात त्याच्या हाताची तीन बोटे तुटून पडली. ही घटना वानवडी येथील नेपीयर रस्त्यावर घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी गणेश हा त्याच्या तोंडओळखीच्या गोट्या नावाच्या व्यक्तीला रस्त्यात भेटला होता. त्याचा राग छोट्या ऊर्फ अभिषेक व ऍन्डी अलटे या दोघांना आला. त्यांनी गणेशला याचा जाब विचारत धमकावले.
ऍन्डीने गणेशला शिवीगाळ करत कॉलर पकडली. तर छोट्याने पाठीमागून कसल्यातरी धारदार शस्त्राने डोक्यात व हाताच्या बोटावर वार केले. यात त्याची करंगळी व शेजारील दोन बोटे तुटून पडली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.