- लहान मुले प्रवास करु शकणार नाहीत
पिंपरी – कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव ज्येष्ठांना झाल्यास अधिक धोकादायक असल्याचे कारण देत, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ज्येष्ठांना व लहान मुलांना पीएमपीमध्ये प्रवास नाकारला होता. मात्र, सोमवारी (दि. 7) पीएमपी प्रशासनाने लहान मुलांची प्रवास बंदी कायम ठेवत ज्येष्ठांच्या प्रवासास मुभा दिली असल्याने आता ज्येष्ठ नागरिक प्रवास करु शकणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी 23 मार्च पासून पीएमपीची प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता टाळेबंदी टप्प्या-टप्प्याने हटवली जात असल्याने 3 सप्टेंबर पासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पाच महिन्यानंतर पुन्हा 25 टक्के बससेवा सुरु करण्यात आली आहे. परंतू यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना झाल्यास धोकादायक असल्याने त्यांना प्रवास नाकारला होता.
परंतु, मार्च महिन्याआधी काढलेल्या प्रवासी पासला मुदतवाढ दिल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून आम्हांला सुद्धा बसमध्ये प्रवासासाठी मुभा द्यावी, अन्यथा आमच्या पासला मुदतवाढ मिळून काय फायदा ? असा प्रश्न उपस्थित केला होता. तर, मुंबईतील बेस्ट बसने ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला असल्याने पीएमपीने सुद्धा याबाबत दखल घेत सोमवार (दि. 7) पासून अटीचे पालन करत ज्येष्ठांना सुद्धा बसने प्रवासास मुभा दिली आहे.
मात्र, 10 वर्षाखालील मुलांना अजूनही प्रवासासाठी परवानगी दिलेली नाही. ज्येष्ठांनी प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी व मास्क सॅनिटाइझर याचा काटेकोरपणे वापर करुनच आवश्यक असेल तरच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.