नवी दिल्ली – एका दलित कुटुंबाचा छळ केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी राज्य सरकारचे मंत्री डी सुधाकर (D sudhakar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डी सुधाकर यांच्यावर मालमत्तेच्या वादातून या कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप आहे. पीडित पक्षाने मंत्र्याविरोधात तक्रार दिली होती. त्याच्या आधारावर नंतर एफआयआर नोंदवण्यात आला. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
सध्या एका वादग्रस्त मालमत्तेत राहणारे सुब्बम्मा आणि आशा यांनी पोलिसांना सांगितले की, डी सुधाकर हे मंत्री रिअल इस्टेट डेव्हलपर्स सेव्हन हिल्ससमवेत शनिवारी येलाहंका येथील वादग्रस्त मालमत्तेवर पोहोचले. त्यांनी मालमत्तेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
त्या मालमत्तेवर 15 महिलांसह 40 जणांनी हल्ला केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. आवारात बांधलेली इमारत व इतर वस्तू पाडण्यासाठी ते लोक जेसीबी घेऊन पुढे जात होते. यानंतर सुब्बम्मा, आशा आणि इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सुब्बम्मा यांची मुलगी आशा हिच्यावरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. पीडितेवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.