नवी दिल्ली :- चीनमध्ये या महिनाअखेरीस सुरु होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट प्रकारात भारताचे पुरुष व महिला क्रिकेट संघ सरस रॅंकिंग गुणांमुळे थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत. यातील महिलांच्या स्पर्धेला येत्या 19 सप्टेबरपासून तर पुरुषाच्या स्पर्धेला 28 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी बीसीसीआयने यापूर्वीच भारतीय संघाची घोषणा केली आहे.
भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपला ब संघ घोषित केला आहे. या संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. तर, महिला संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडेच कायम राखले गेले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात पंचांबाबत गैरवर्तन केल्यामुळे हरमनप्रीत कौरवर 2 सामन्यांची बंदी लावली गेली आहे. त्यामुळे जर भारतीय महिला संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला तरच हरमनप्रीतला खेळण्याची संधी मिळेल. अशा स्थितीत उपकर्णधार मानधना पहिल्या दोन्ही लढतींत संघाचे नेतृत्व करेल. महिलांच्या स्पर्धेचा अंतिम सामना 26 सप्टेंबर रोजी तर पुरुषांच्या स्पर्धेचा अंतिम सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे.
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथील झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत. क्रिकेटसह सर्व स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्टस नेटवर्कवर केले जाणार असून सोनी लाइव्ह ऍपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग केले जाईल.
भारताचा – पुरुष संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (अतिरीक्त यष्टीरक्षक). राखीव खेळाडू – यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.
महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी मिनु गायकवाड, तितास साधू , कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी. राखीव खेळाडू – हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.