ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक निकोलायचा आढळला मृतदेह

नवी दिल्ली  – भारतीय ॲथलेटिक्‍स संघातील मध्यम पल्ल्याच्या धावपटूंचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बेलारुसचे निकोलाय स्नेसारेव हे आज राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेतील त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले.

आज सकाळीच त्यांनी आपले प्रशिक्षणाचे काम आटोपले होते. त्यानंतर ते आपल्या रुममध्ये परतले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेहच आढळला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

यापूर्वी एकदा निकोलाय यांनी भारताच्या लांब पल्ल्याच्या प्रीजा श्रीधरन आणि कविता राऊत या भारतीय धावपटूंना मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर त्यांनी सुधा सिंग, ललिता बाबर अशा पदकविजेत्या धावपटू भारताला दिल्या. त्यांच्या अशा आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने देखील निकोलाय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला गेला. निकोलाय हे साधे आणि सरळ व्यक्‍तिमत्त्व होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा आमच्या खेळाडूंना चांगला फायदा झाला. त्यांची उणीव भरून निघणार नाही, असे त्यांना आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.