क्रिेकेट काॅर्नर | …अखेर नशीब पालटले

-अमित डोंगरे

क्रिकेट हा अनिश्‍चिततेने भरलेला खेळच आहे, असे म्हणतात ते काही खोटे नाही. आता हेच पाहा ना, ज्या ऋषभ पंतला सातत्याने टीकेचा धनी व्हावे लागत होते. त्याच्यावर ताशेरे ओढण्याची एकही संधी समीक्षक, टीकाकार, आजी-माजी क्रिकेटपटू सोडत नव्हते. तेच आता त्याच्या प्रेमात पडले आहेत. कोणाच्या आयुष्याला कधी कलाटणी मिळेल, कोणाचे आयुष्य कधी पालटेल काही सांगता येत नाही. हेच पंतच्या बाबतीत घडले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अगदी काल-परवा ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वीपर्यंत पंत एक सामान्यच नव्हे तर अतिसामान्य क्रिकेटपटू होता. खरेतर त्याला या मालिकेसाठी भारतीय संघात संधीच का दिली गेली, असे प्रश्‍नही विचारले जात होते. तोच पंत जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर मायदेशी परतला तेव्हा परिस्थिती अगदी भिन्न होती.
त्याच्यावर टीका करणारेही त्याच्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ब्रिस्बेनच्या कसोटीत भारतीय संघ पराभवाच्या छायेत येतो काय, पंत एक अविश्‍वसनीय 97 धावांची खेळी खेळतो काय. एका पडद्याआड जाऊ घातलेल्या क्रिकेटपटूचा जणू पुनर्जन्मच झाला, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

एक टीकेचा धनी बनत असलेला क्रिकेटपटू अचानक सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनू शकतो यालाच नशिबाचे फासे आपल्या बाजूने पडणे म्हणत असावेत. पंतच्या एकूण कारकिर्दीबाबत बोलायचे तर त्याचा स्ट्रगल एखाद्या चित्रपटाची कथाही ठरेल. ऑस्ट्रेलियात एक सामान्य क्रिकेटपटू भारतीय संघाकडून गेला पण जेव्हा तो मायदेशी परतला. तेव्हा मात्र, एक संकटमोचक फलंदाज बनून परतला.
आधी जेव्हा त्याला सातत्याने संधी दिली जात होती व तो देखील अत्यंत बेजबाबदार पद्धतीने बाद होत होता ते पाहून हा कोणाच्या वशिल्याचा तट्टू आहे, असे विचारले गेले. त्याच्यावर सोशल मीडियावर अत्यंत हिन शब्दांनी टीकेचा धनीही बनवले गेले. इतकी पराकोटीची टीका त्याच्यावर झाली की त्याची बाजू घ्यायला जगभरातील अनेक माजी व आदरणीय क्रिकेटपटूंना त्याच्यासाठी बॅटिंग करावी लागली व पंतला लक्ष्य बनवू नका, असे आवाहन करावे लागले.

तरीही परिस्थिती तिच राहिली आणि अचानक वृद्धिमान साहासह अतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पंतची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. तेव्हा देखील त्यालाच का संधी दिली जात आहे, असा प्रश्‍नही विचारला गेला. पण पंतने या मालिकेत सगळ्यांचे हिशेब चुकते करत आपल्यावरचा चोकर्सचा शिक्का पुसून काढत संकटमोचक म्हणून नावारूपाला आला.
याच पंतने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था अत्यंत बिकट असताना अफलातून शतकी खेळी करत पिछाडीवर असलेल्या संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. तसेच हा सामना भारतीय संघाच्या बाजूने झुकवला.

पंतने इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी जी शतकी खेळी केली ती एकदिवसीय सामन्यांना साजेशी होती. त्याने धावा करतानाच इंग्लंडच्या गोलंदाजांच्या पाठीवर कोरडे ओढण्याचे काम केले. त्यामुळे इंग्लंडचे गोलंदाज नैराश्‍यात गेल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत होते. आता पंत कोणाच्या वशिल्यामुळे नव्हे तर स्वकतृत्वावरच संघात राहिल हा विश्‍वास त्याने भारतीय संघाला तसेच आपल्या चाहत्यांनाही दिला आहे. तो महेंद्रसिंह धोनीचा वारसदार ठरेल का नाही हे नाही सांगता येत नाही. पण भारतीय संघाला संकटातून बाहेर काढणारा एक आश्‍वासक खेळाडू तो निश्‍चितच ठरेल, यात शंका नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.