नवी दिल्ली – देशभरातील महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत 18,711 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक 10,187 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 2,791 तर पंजाबमध्ये 1,159 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील आठ राज्यांत दैनंदिन रूग्णांत सतत वाढ होत असलेली दिसून येत आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या आज 1.84 लाखांवर पोचली आहे.
आतापर्यंत प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आली.
आज, लसीकरण मोहिमेच्या 50 व्या दिवशी एकूण 4 लाखांपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या. यापैकी 11,71,673 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 2,53,020 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
गेल्या 24 तासांत 100 मृत्यूंची नोंद झाली. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 47 मृत्यू झाले असून त्याखालोखाल केरळमध्ये 16 तर पंजाबमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.