पुणे – ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे (Dr. Vinayak kale) यांची पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली असून बुधवारी रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे, काळे पुन्हा ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन येणार असून आज ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. आता काळे पुन्हा एकदा ससूनमध्ये आपला पदभार स्वीकारू शकतात.
जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती. एकप्रकारे डॉ. ठाकूर यांनी राजकीय वजन वापरून त्यांचा पत्ता कट केला होता. त्याविरोधात डॉ. काळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये गेले होते. ‘मॅट’ ने सहा महिन्यानंतर जुलै महिन्यात डाॅ. काळे यांच्या बाजूने निर्णय दिला.
मात्र या निकालाविरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या नंतर उच्च न्यायालयाने डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द ठरवली होती. त्यानंतर आता पुन्हा काळे यांना अधिष्ठाता करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले आहेत तसेच ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाही डॉ. संजीव ठाकूर यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने पदमुक्त केले. तेव्हापासून या पदावर डॉ. काळे येणार अशी चर्चा होती. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांची ऑर्डर काढली नव्हती. मात्र बुधवारी डॉ. काळे यांची शासनाने ऑर्डर काढली आहे.