पुणे – आर्थिक परिस्थिती स्थिर झाल्यानंतर आता दहावीची परीक्षा देण्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्यादृष्टीने विचार करून वयाच्या 59 वर्षी दहावी परीक्षा दिली आणि तब्बल 45 वर्षांनतर शीतल सतीश अमराळे या दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.
मंडई येथील रहिवासी असलेल्या शीतल अमराळे यांनी घरी कुणालाही कल्पना न देता दहावी परीक्षेचा फार्म भरला. घरी दररोज कुणाला कळू न देता अभ्यास करायची. घरी कुणी विचारले तरी मी पुस्तक वाचत असल्याचे सांगत असे. ही गोष्ट नंतर सर्वांना कळाल्यानंतर सर्वांनी त्यांना प्रोत्साहित केले. इतकेच नव्हे, तर सुना व नातवडांनी त्यांना अभ्यासासाठी मदत करायची.
मी दहावी उत्तीर्ण होईन की नाही, याची भीती होती. मात्र, धाडसाने परीक्षा दिली. त्याप्रमाणे दहावीत 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही, अशी भावना शीतल अमराळे यांनी व्यक्त केल्या. अमराळे यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. त्यांना स्वप्नील आणि सौरभ अशी दोन मुले आहेत. सौरभ हे युवक कॉंग्रेसचा शहर उपाध्यक्ष आहेत.
आईने इतक्या वर्षानंतर परीक्षा दिली आणि पास झाली हे समजले तेव्हा मी दहावी पास झालो, जेवढा आनंद झाला होता. त्यापेक्षा जास्त आई दहावीत पास झाल्याचा आहे, असे शीतल अमराळे यांचा मुलगा सौरभ अमराळे म्हणाला.