शिक्रापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज शुक्रवार २ जून रोजी ऑनलाइन जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात शिरूर तालुक्याने बाजी मारली आहे असून शिरुर तालुक्याचा निकाल ९६.४७ टक्के लागला असून तालुक्यातील तब्बल सत्तावीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
शिरुर तालुक्यातील शाळांनी ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालात सातत्य राखले असून शिरुर तालुक्याचा सरासरी निकाल ९६.४७ टक्के असा लागला आहे. शिरुर तालुक्यात एकूण चौऱ्याऐंशी माध्यमिक विद्यालये आहेत. मार्च २०२३ च्या दहावीच्या परीक्षेस शिरुर तालुक्यातील तब्बल ६५०४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ६२७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने शिरुर तालुक्याचा निकाल ९६.४७ टक्के लागला आहे.
यावर्षीचे शिरूर तालुका गुणवत्ता वैशिष्टय म्हणजे २२२६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झाले असून तालुका गुणवत्तेचा आलेख उंचावला असताना शिष्यवृत्ती परीक्षेत देखील शिरुर तालुका राज्यात अग्रणी राहीला आहे.
शिरुर तालुक्यातील श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापर, श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी, संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल मुखई, कै. रा. गे. पलांडे माध्यमिक आश्रम शाळा मुखई, ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर तळेगाव ढमढेरे, श्री संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक, विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, स्वातंत्र्य सेनानी स्व, शंकरराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे, श्री. गुरुनाथ विद्यालय वडनेर खुर्द, कालिका माता विद्यालय वाघाळे, अभिनव विद्यालय सरदवाडी, तात्यासाहेब सोनवणे विद्यालय निर्वी, कै. के. पी. गदादे विद्यालय तांदळी, आयेशा बेगम उर्दू हायस्कूल घोडनदी शिरूर, न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे, आदर्श विद्यालय वरुडे, एकता विद्यालय करंजावणे, रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, स्वर्गीय आबासाहेब पाचंगे विद्यालय ढोकसांगवी, फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोरेगाव भीमा, श्री पद्ममनी इंग्लिश स्कूल पाबळ, विजयमाला विद्यामंदिर शिरूर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी, आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल कोंढापुरी, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.