भाष्य (प्रकाश यादव) – प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला अतिशय महत्व असते. एका सेकंदासाठीही एखादा स्पर्धेक स्पर्धेतून बाद होतो. त्यामुळे प्रत्येक जण आयुष्यात वेळ पाळण्यासाठी घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत असतो. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना वेळ पाळण्याचे वावडे दिसून येत आहे. सध्या महापालिकेत प्रशासक राजवट सुरू असल्याने शहराच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रश्नांसाठी नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी महापालिकेत येतात. मात्र, आयुक्तच कार्यालयात नसल्याने नागरिकांना आल्या पावली निराश होऊन घरी परतावे लागते. त्यामुळे आयुक्त साहेब वेळ दिली तर वेळ पाळा, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा 12 मार्च 2022 रोजी कालावधी संपला आहे. त्यामुळे 13 मार्च 2022 पासून महापालिकेवर प्रशासक आहे. महापालिकेच्या संबंधित कामकाजासाठी मुख्य कार्यालयात दररोज आयुक्तांकडे भेटीसाठी समक्ष येत असतात. कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आठवड्यातील तीन दिवस भेटणार असल्याबाबतचा आदेश 13 ऑक्टोबर 2022 रोजी नव्याने काढण्यात आला. त्यानुसार सिंह हे नागरिकांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत नागरिकांना भेटणे अपेक्षित आहे. हा आदेश काढण्यापूर्वी आयुक्त दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत नागरिकांना भेटत होते. यामध्ये एक तासाची वाढ करण्यात आल्याने शहरवासियांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, नागरिकांना दिलेल्या वेळेत आयुक्त सिंह विविध विषयांच्या बैठकांसाठी ऍटो क्लस्टरमध्ये जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात बुधवार (दि.16) आणि सोमवार (दि.21) रोजी नागरिकांना आयुक्त भेटणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्त सिंह विविध बैठकांसाठी ऍटो क्लस्टरमध्ये जात असल्याने कामे घेऊन आलेल्या नागरिकांची निराशा होऊ लागली आहे.
नगरसेवक नसल्याने नागरिकांचा कामांसाठी आयुक्तांकडे भेटण्यासाठी ओघ असतो. नागरिक विविध कामे घेऊन आयुक्तांना भेटण्यासाठी येतात. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी नागरिकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवला आहे. आठवड्यातील कार्यालयीन कामकाजाच्यादिवशी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटणे अपेक्षित आहे. आयुक्त काही प्रसंगी अन्य शासकीय कार्यालय, मंत्रालय मुंबई अथवा महापालिका सभा, स्थायी समिती, विधी समिती सभांकरिता सभागृहामध्ये उपस्थित असतात. त्यामुळे अशावेळी आयुक्त नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असे आदेशात स्पष्ट केले होते.
मात्र, शासकीय कार्यालय, मंत्रालय मुंबई अथवा महापालिका सभा, स्थायी समिती, विधी समिती नसतानाही आयुक्त सिंह हे नागरिकांना भेटीसाठी दिलेल्या वेळा पाळत नसल्याचे दिसून येत आहे. आयुक्त हे सल्लागार आणि स्मार्ट सिटीच्या बैठकांमध्येच गुरफटले गेल्याची चर्चा महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी खाजगीत बोलत आहेत.
फाईलवर स्वाक्षरी घेण्यासाठी अधिकारी तासन् तास ताटकळत
एखाद्या विभागाच्या महत्वाचा विषय मंजुर होण्यासाठी आयुक्त सिंह यांची त्वरीत स्वाक्षरी होणे अपेक्षित असते. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी आयुक्तांची स्वाक्षरी घेण्यासाठी जातात. त्यावेळी अधिकाऱ्यांना तासन् तास आयुक्तांची स्वाक्षरी घेण्यासाठी काम सोडून थांबावे लागत आहे. त्यानंतरही आयुक्तांची कधी स्वाक्षरी होते तर कधी होत नाही. त्यामुळे आयुक्त सिंह यांच्या कारभारावर अनेक अधिकारी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.