संभाजीनगर, दि. 22 (वार्ताहर) – स्पाइन रोड हा पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. या मार्गाच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर जागा मोकळी आहे. सध्या महापालिकेच्या “फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चेरीज चौक ते भाजी मार्केट चौक दरम्यान हॉकर्स झोन तयार करण्यात आला आहे. परंतु हा झोन धूळ खात पडला असून व्यावसायिकांनी आपली दुकाने पदपथावर थाटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नव्याने बनविलेल्या चेरीज चौकाला बकालपणा येऊ लागला आहे.
स्पाइन रोडचे त्रिवेणीनगर चौकाजवळ काही मीटर रस्त्याचे काम कित्येक वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्णक्षमतेने वापरात येत नाही. परंतु विस्तृत मार्गाच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर जागा आहे. या जागेत सध्या उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. तर भाजी मार्केट चौक आणि चेरीज चौकाच्या दोन्ही बाजूला महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून हॉकर्स झोन बनविण्यात आला आहे. चेरीज चौकातील हॉकर्स झोनचे काम पूर्ण झालेले आहे. तेथे व्यावसायिकांसाठी सिमेंटचे ओटे तयार करण्यात आले आहेत. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना व व्यासायिकांसाठी स्वच्छतागृह उभारले आहे. स्ट्रेट लाइट उभारण्यात आली आहे. या सर्व सोयीसुविधा देऊन देखील हातगाडी व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून तयार केलेले हॉकर्स झोन सध्या धूळ खात पडून आहे.
सर्व सोयीसुविधा देऊन देखील चेरीज चौकातील हातगाडीवाल्या व्यावसायिकांनी तेथे जागा धरून ठेवली आहे. परंतु व्यवसाय त्या ठिकाणी करताना दिसून येत नाहीत. महापालिकेच्या वतीने चेरीज चौकाचे सुशोभीकरण व विस्तारणीकरण करण्यात आले आहे.
त्यामुळे चेरीज चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. परंतु चौकाचे सुशोभीकरण करताना पादचाऱ्यांसाठी विस्तृत पदपथ उभारले आहेत. या पदपथांवर हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने एवढे पैसे खरेदी करून चौकाचे केलेले सुशोभीकरण बकालपणा येऊ लागला आहे.
अतिक्रमण विरोधी पथकाचे दुर्लक्ष
मागील काही महिन्यांपूर्वी सर्वच क्षेत्रीय कार्यालयनिहाय अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली होती. तेव्हा “फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने चेरीज चौकात वारंवार कारवाई केल्याने सर्व हातगाडीवाले, पथारीवाले गायब झाले होते. परंतु आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली आणि पुन्हा हातगाडीवाले चौकात आपले बस्तान बसवू लागले आहेत. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा चौकात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.