बीजिंग – चीनच्या ईशान्येकडील भागात झालेल्या एका चाकू हल्ल्यामध्ये 7 जण ठार झाले आहेत. ईशान्य चीनमधील लियानिंग प्रांतात कैयुआन शहरात सॉना आणि सार्वजनिक न्हाणीघराबाहेर ही घटना घडली. या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात आली असून त्याने केलेल्या या चाकू हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
चीनमध्ये बंदुकींच्या विक्री आणि जवळ बाळगण्याला बंदी आहे. त्यामुळे सामूहिक हत्याकांडामध्ये चाकू, सुरे आणि घरगुती वापरातील स्फोटकांचा वापर केला जातो. अशा स्वरुपाचे हल्ले करणाऱ्या व्यक्ती मनोरुग्ण अथवा समाजाविरोधात सूड घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे आढळले आहे.
यापूर्वी घडलेल्या अशा घटनंमध्ये एका शाळेच्या सुरक्षा रक्षकाने गेल्या वर्षी जूनमध्ये दक्षिणेकडील गॉक्सी भागातल्या एका बालवाडीमध्ये धारदार चाकूने किमान 39 जणांवर वार करून त्यांना जखमी केले होते. हा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली होती. तर 2018 मध्ये एका व्यक्तीने बीजिंगमधील एका मॉलमध्ये चाकू हल्ला करून एकाची हत्या आणि 12 जणांना जखमी केले होते.