पत्रकार डॅनिएल पर्ल हत्या प्रकरण: मारेकऱ्यांना न सोडण्याचा सिंध सरकारचा निर्णय

इस्लामाबाद – अमेरिकेतील पत्रकार डॅनिएल पर्ल यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या मूळ ब्रिटीशवंशिय अल कायदाचा म्होरक्‍या सईद शेख आणि त्याच्या तीन साथीदारांची सुटका न करण्याचा निर्णय सिंध प्रांताच्या सरकारने घेतला आहे.

सिंध उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पिठाने गुरुवारी शेख आणि इतर आरोपींना कोणत्याही प्रकारे ताब्यात ठेवू नये, असे आदेश दिले. तसेच सिंध सरकारने या आरोपींच्या कोठडीबाबत दिलेले सर्व आदेश तातडीने रद्द ठरवण्याचे आदेश दिले. या चारही आरोपींना ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.

सिंध उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अनेक स्तरांमधून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने जर सुटकेला विरोध केला तरच या आरोपींची सुटका होऊ नये, असेही सिंध उच्च न्यायालयाने या आरोपींच्या सुटकेचे आदेश देतानाच स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी दिलेले आदेश अजूनही लागू आहेत. त्यामुळे सिंध प्रांतातील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारने या आरोपींची सुटका न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आरोपींना सिंध उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात निर्दोष मुक्‍त करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला पत्रकार डॅनिएल पर्ल यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर पुढील सुनावणीपर्यंत या आरोपींची सुटका केली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबरच्या सुनावणीत म्हटले होते. या आरोपींना कधीपर्यंत ताब्यात ठेवण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाच्या आदेशात नव्हते.

आरोपींच्या मुक्ततेबाबत उच्च न्यायालयाने 24 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशांनाही सिंध सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे समजते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.