घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे

पालकमंत्री बाळासाहेब पाटील; "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम जिल्ह्यात सुरू

सातारा – करोना संसर्गावर मात करण्यासाठी राज्य शासनाची “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम आजपासून सुरु करण्यात आली आहे. 

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येणार असून करोना संसर्गापासून बचाव कसा करावा व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती सांगण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 

ही मोहीम आजपासून ते 24 ऑक्‍टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीचे वय, आरोग्याची परिस्थिती, ऑक्‍सिजन लेव्हल यांची तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी व गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवणे, जेवण करताना सुरक्षित अंतर ठेवणे या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

ही मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर व 14 ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा लाख 80 हजार कुटुंबाना पथक भेट देणार आहे. या पथकामध्ये तीन जणांचा समावेश असून यांना करोना दूत म्हणून संबोधण्यात येणार आहे. या पथकाकडून विचारलेलया प्रश्‍नांची खरी उत्तरे द्यावीत. जिल्ह्यातील युवक युवतींनी या मोहिमेत सहभागी होऊन एक सामाजिक दायित्व म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

 

शंभूराज देसाई करणार अनेक घरांमध्ये जागृती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमतून आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे या भावनेतून करोना संसर्गापासून बचावाबाबत गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात वेगवेगळ्या पथकांद्वारे जागृती होईल. मी स्वत: अनेक घरांमध्ये जनजागृती करणार आहे, असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यासाठी जागृती करणे आवश्‍यक आहे. मोहिमेमुळे करोना संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.