सातारा, (प्रतिनिधी)- ठोसेघर (ता. सातारा) येथील सुरेश विठ्ठल जाधव (वय ४३) यांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता ठोसेघर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश जाधव गवंडी काम करायचे. मात्र, ते एकटेच राहत होते. बुधवारी रात्री ते घरात झोपले होते. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला.
यानंतर पांगारे येथील पोलीस पाटीलांनी याची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक लोकांशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर हा खून एका अल्पवयीन मुलाने केला असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलाला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. वारंवार दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे हा खून केला असल्याची त्याने कबुली दिली. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अरविंद काळे तपास करीत आहेत.