जकार्ता – भारताची स्टार नेमबाज नॅन्सी हिने आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीतील महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. याच प्रकारात ऑलिम्पियन नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने रजतपदकाची कमाई केली. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटील याने ब्राँझपदकावर नाव कोरले.
नॅन्सी हिने विक्रमी २५२.८ गुणांची कमाई करताना सुवर्णपदक मिळवले. इलावेनिल हिचे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकले. तिने २५२.७ गुणांसह रजतपदकावर नाव कोरले. मेहुली घोष हिला २०१० गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
चीनच्या शेन युफान हिने ब्राँझपदक पटकावले. भारताच्या तीन महिला नेमबाजांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली. रुद्रांक्ष पाटील याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात २२८.७ गुणांसह ब्राँझपदक मिळवले.
Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
दरम्यान, याच स्पर्धेत भारताचा स्टार नेमबाज वरुण तोमर व अव्वल महिला नेमबाज ईशा सिंग यांनी आशियाई पात्रता फेरीत आपआपल्या गटात सुवर्णपदक पटकावले आणि भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. वरुण याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात व ईशा हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.