बाकू – आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावताना खाते उघडले. भारतीय महिला नेमबाज संघाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. एलाव्हेनिल एल्वेनिल, रमिता व श्रेया अग्रवाल यांनी देशाला हे यश मिळवून दिले. ही स्पर्धा अझरबौजानमध्ये सुरू आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करताना या तिघींनी डेन्मार्कच्या ऍना निलसेन, एमा कोच आणि रिक्की एबसेन यांच्यावर 17-5 अशी मात केली. या गटात डेन्मार्कने रजतपदक, तर पोलंडने ब्रॉंझपदक मिळवले. एल्वेनिल, रमिता व श्रेया यांनी दोन फेऱ्यांची पात्रता फेरी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय महिला संघाने पात्रता फेरीत 944.4 गुण मिळवले. दुसऱ्या फेरीत डेन्मार्कने सरस कामगिरी केली. त्यानंतर सुवर्णपदकासाठी लढत झाली व त्यात भारतीय महिला संघाने बाजी मारली.
पुरुष गटात रायफल सांघिक प्रकारात भारताच्या रुद्राक्ष पाटील, पार्थ मखिजा व धनुष श्रीकांत यांना तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना क्रोएशियाकडून 16-10 असा पराभव स्वीकारावा लागला.