Ashok Gehlot Nomination : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. उमेदवारी अर्जात माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले आहे. त्यात त्यांचे उमेदवारी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशोक गेहलोत यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अपूर्ण माहिती दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण ?
अशोक गेहलोत यांच्याविरोधात पवन पारीक नावाच्या व्यक्तीने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. सरदारपुराचे उमेदवार अशोक गेहलोत यांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या तक्रारीत प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांची माहिती जाणूनबुजून लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोणत्या प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला?
पवन पारीक यांनी आपल्या तक्रारीत दोन प्रकरणांचा उल्लेख केला. यातील पहिले प्रकरण 8 सप्टेंबर 2015 चे आहे. जयपूरच्या गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 409/2015 मध्ये अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध कलम 166, 409, 420, 467, 471 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. 31 मार्च 2022 रोजी आणखी एक प्रकरण नोंदवले गेले आहे. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला होता. दोन्ही प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.