गणेश घाडगे
नेवासे -तालुक्यातील 278 आशा सेविका व 441 अंगणवाडी स्वयंसेविकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रखरखत्या उन्हात तालुक्यातील सुमारे 67 हजार 429 कुटुंबाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. यावेळी तपासणीनंतर 53 नागरिकांना होम क्वारंटाईन, तर 381 नागरिकांना गावपातळीवर गाव समितीच्या देखरेखीखाली क्वारंटाईन केले गेले. पहिल्या सर्वेक्षण फेरीत दोन, तर दुसऱ्या फेरीत एक, तिसऱ्या फेरीत सारी संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर तालुक्यात चौथी सर्वेक्षण फेरी आशा व अंगणवाडी सेविकांनी सुरू केली आहे. त्यामुळे करोनो संकटाशी यशस्वी लढा देणाऱ्या त्या रणरागिणी ठरल्या आहेत.
कोविड-19 या संसर्गजन्य आजाराचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. हे संकट नेवासे तालुक्यात धडकले. त्यात तीन जण करोनाबाधित आढळून आले. अशा परिस्थितीत तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यवंशी यांच्या टीमने करोनोला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी कंबर कसली. त्यांच्या नियोजनामुळे करोनाची साखळी तोडण्यात यश आले. या काळात डॉ. अभिराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 278 आशा व 441 अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांनी तालुक्यात 112 गावांतील प्रत्येक कुटुंबात जाऊन करोनो व सारीबाबत जनजागृती केली.
घरोघरी जाऊन कोणाला ताप, घशात खवखव होते का, याची माहिती घेत आहेत. तसेच दिवसभराच्या तपासणीचा आरोग्य विभागाला अहवाल सादर करत आहेत. आरोग्य सेवकांच्या टीमने नेवासे शहरातील हजारो कुटुंबातील व्यक्तींची तपासणी केली. जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या आशा स्वयंसेविकांना तुटपुंजे मानधन देऊन त्यांची बोळवण केली जाते आहे. ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता त्या ग्रामीण भागात काम करतात आरोग्य विभागाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवित आहेत.
ईश्वर सेवा मानून करतो काम
शासन आम्हाला अल्प मानधन देते. परंतु नागरिकांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करत आहोत. करोनो आपत्तीच्या काळात होम टू होम सर्वेक्षण केले. यावेळी अनेक जण माहिती देत नाहीत. त्यामुळे अडचणी येतात. मात्र कोणताही कमीपणा न मानता काम करत आहोत, असे शुभांगी घाडगे, शोभा काळे, सविता घोडेचोर, संगीता साळवे या आशा सेविकांनी सांगितले.