विविध ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले सुरूच ः भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचाही मृत्यू
आळेफाटा -चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या बिबट्याचा मृत्यू तीन-चार दिवसांपूर्वी झाला असल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील शेतकरी महादेव सोनवणे आणि भागाजी सोनवणे यांची चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे सामाईक विहिर असून, गुरुवारी (दि. 26) सकाळी साडेनऊच्या सुमारास सोनवणे यांच्या सुनबाई अनिता सोनवणे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना या विहिरीत बिबट्या मृतावस्थेत दिसून आला.
याबाबतची माहिती त्यांनी पती संदीप सोनवणे यांना दिल्यावर, संदीप यांनी वनखात्याला हे कळवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल संतोष साळुंके, एस. आर. खट्टे, वनरक्षक व्ही. टी. विभुते, ए. बी. देशमुख, वनकर्मचारी बी. के. खर्गे, रेस्क्यू टीमचे सदस्य आकाश माळी, दीपक माळी, अजिंक्य भालेराव, बाबाजी खर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या बिबट्यास विहिरीच्या बाहेर काढले.
या बिबट्याचा मृत्यू तीन-चार दिवसांपूर्वी झाला असल्याने बिबट्याचा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. मंगेश खिलारी यांनी या बिबट्याचे जागेवरच शवविच्छेदन केले आणि त्यानंतर या बिबट्यावर या विहिरीजवळच असलेल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा बिबट्या नर जातीचा असून, तो अंदाजे तीन-चार वर्षांचा असल्याचे डॉ. मंगेश खिलारी यांनी सांगितले. हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरत असताना विहिरीत पडला असण्याची
शक्यता आहे.