सातारा – सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम व उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटची मासिक सभा उद्या, दि. 27 रोजी दुपारी 1 वाजता होत आहे. या सभेत पदाधिकारी आपल्या कामांचा लेखाजोखा मांडतील, अशी शक्यता आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात सध्या मटण दरवाढीचा प्रश्न ज्वलंत असून यावर तोडगा काढण्यासाठी सदस्य राहुल शिंदे सभेत आवाज उठवणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे मटण दरवाढीचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात मटणाच्या दराने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. काही समाजसेवी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात मटणाचा दर प्रतिकिलो 580 रुपये करावा, अशी मागणी केली होती.
त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. खाटीक संघटनेने दोन दिवसांपूर्वी सातारा येथे बैठक घेऊन मार्च 2020 पर्यंत मटणाचे दर कमी न करण्याची आग्रही भूमिका घेतली. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे यांनी उद्याच्या सभेत मटण दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्याचा चंग बांधला आहे. प्रत्येक पंचायत समिती
गणात मटणाचे दुकान सुरू करण्यासाठी सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करावेत, असे आवाहन ते करणार असल्याचे समजते. तालुक्यातील विक्रेत्यांनी 580 रुपये किलो दराने मटण विकावे, असा ठराव घेण्याची तयारी जितेंद्र सावंत यांनी दर्शविल्याचे समजते.