पुणे – कांद्याचे भाव वाढले आहेत. त्याचा परिणाम कांदापातीच्या भावावर झाला आहे. शेतकऱ्यांनी कांदापात काढणे कमी केले आहे. परिणामी, मार्केट यार्डातील तरकारी विभागातील आवक घटली आहे. त्यामुळे 10 दिवसात कांदापातच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे. कांदापातचे भाव किरकोळ बाजारातही वाढले आहेत. जुडीला 30 ते 40 रुपये मोजावे लागत आहे.
पावसाने पाठ फिरविल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. दि. 1 ऑक्टोबर रोजी घाऊक बाजारात किलोला 18 ते 23 रुपये भाव मिळणाऱ्या कांद्याला आता 45 ते 50 रुपये भाव मिळत आहे. महिनाभरात दुपटीहून अधिक आवक झाली आहे. त्याचा परिणाम कांदापातीच्या आवकवर झाला आहे. मार्केट यार्ड येथील बाजारात 10 दिवसांपूर्वी 12 ते 15 हजार जुडी कांदापातची आवक होत होती. आता 7 हजार जुडी आवक झाली आहे, असे थेऊर येथील शेतकरी सौरभ ताम्हाणे म्हणाले.
“कांदापातीची आवक दहा दिवसांच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात भावात वाढ झाली आहे. 10 रुपये भाव मिळणाऱ्य जुडीला दर्जानुसार 15 ते 20 रुपये भाव मिळत आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.” – राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाज्यांचे व्यापारी, मार्केट यार्ड