नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मधुमेह आहे. त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. (arvind kejriwals health deteriorated in ed custody sugar level dropped)
कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल हे अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी डिजिटल माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, काल संध्याकाळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांची ईडीच्या कोठडीत भेट घेतली. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळीत चढ-उतार होत आहे. सुनीता केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
सूत्रांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीपर्यंत घसरली आहे. सूत्रांनी दावा केला आहे की केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी एकदा 46 मिलीग्राम (mg) पर्यंत खाली आली होती आणि डॉक्टरांच्या मते, हे खूप धोकादायक आहे.
अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी अटक केली. एजन्सीने त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल हे त्यांचे मंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या संगनमताने या दिल्ली दारू धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप एजन्सीने केला आहे.
सुनीता केजरीवाल यांनी बुधवारी सांगितले की, ईडीच्या अनेक छाप्यांमध्ये एक पैसाही सापडला नाही. 28 मार्च रोजी कोर्टात कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांचे पती मोठा खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 28 मार्च रोजी ते सत्य सांगतील आणि पुरावेही सादर करतील, असे सुनीता यांनी सांगितले.
सुनिता केजरीवाल म्हणाल्या, “दोन वर्षे तपास करूनही ईडीला एका पैशाचाही पुरावा सापडलेला नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला पण त्यांना फक्त 73,000 रुपये सापडले.” सुनीता केजरीवाल म्हणाल्या, “माझ्या पतीने कोठडीत असताना जलमंत्री आतिशी यांना सूचना दिल्या. यामुळे केंद्राची अडचण झाली. त्यांना दिल्ली नष्ट करायची आहे का? असा सवालही त्यांनी केला. या प्रकरणामुळे अरविंद खूप दु:खी आहेत. अरविंद केजरीवाल हे धाडसी आणि सत्यवादी आहेत आणि त्यांचा निश्चय मजबूत आहे, असे सुनिता केजरीवाल म्हणाल्या.
आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यांना 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
हे प्रकरण 2021-22 साठी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. हे धोरण नंतर रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.