Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने न्यायालयात 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात केजरीवाल यांना हजर करण्यात आले होते. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना काल, गुरुवारी दोन तासांच्या चौकशीअंती ईडीने अटक केली.
ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी राऊज अव्हेन्यू कोर्टातील विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू झाली. केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी ईडीने कोर्टाकडे 10 दिवसांची रिमांड मागितली. तसेच, ईडीने कोर्टासमोर केजरीवाल हेच मद्य घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा युक्तीवाद केला आहे.
दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून
अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ईडीने गुरुवारी तत्काळ कारवाई करून त्यांना अटक केली. दरम्यान, आज या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.