नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लवकरच करोना चाचणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांना सौम्य ताप आला असून सर्दी सुद्धा झाली आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी खबरदारी घेत स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
रविवारी केजरीवालांना सौम्य ताप आला होता व त्यांचा गळा सुद्धा खराब झाला होता. करोनाचा धोका लक्षात घेता त्यांची करोना चाचणी केली जाऊ शकते. कारण दिल्लीमध्ये अनलॉक १.० सुरु झाल्यापासून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. आजारी असल्यामुळे केजरीवाल यांच्या सोमवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या.
दिल्लीतील करोना स्थितीची माहिती देण्यासाठी केजरीवालांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर केजरीवालांची तब्येत बिघडली. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री स्वत: क्वारंटाइन आहेत अशी माहिती केजरीवाल सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली.