नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे उद्यापासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यावर सध्या ईडीच्या समन्सची टांगती तलवार आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी पक्षाच्या बांधणीच्या कामासाठी गुजरात या भाजप शासित राज्याची निवड केली आहे. तेथे ते जाहीर सभा आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने तीन समन्स पाठवले होते पण हे तिन्ही समन्स त्यांनी धुडकावले आहेत. हे समन्स पाठवण्यामागे केवळ राजकीय सूड बुद्धी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, केजरीवालांचा हा गुजरातचा नियोजित दौरा तीन दिवसांचा प्रस्तावित होता, परंतु येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री आज अर्थमंत्री आतिशी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याने त्यांनी हा दौरा दोन दिवसांचाच ठेवला आहे. केजरीवाल आणि त्यांचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या दुपारी वडोदरा विमानतळावर पोहोचतील.
जाहीर सभेला करणार संबोधित
दरम्यान, मुख्यमंत्री येत्या लोकसभा निवडणुकीसंबंधात पक्षाच्या पदाधिकाऱ्यां सोबत सायंकाळी ७ वाजता आढावा बैठक घेणार आहेत. सोमवारी ते पक्षाचे आमदार चैतर वसावा यांचीही भेट घेणार आहेत. आदिवासी चेहरा असलेले वसावा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आप पक्षाने नुकतीच केली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमीपक्षाने गुजरात मध्ये पाच जागा जिंकून आपले खाते उघडले आहे. कॉंग्रेसच्या मदतीने ते गुजरात मध्ये लोकसभेच्याही काही जागा लढवणार आहेत.