आर्त साद…! “बाबा तुम्ही लवकर परत या…” बेपत्ता जवानाच्या मुलीची हाक ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत २२ जवान शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मुलीने आपल्या वडिलांना घातलेली आर्त साद तुमच्या आमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

राकेश्वर सिंह मनहास असे या बेपत्ता जवानाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. मनहास यांच्या लहानग्या मुलीला वडिलांची खूप आठवण येत असून, ते घरी आले नाही, म्हणून तिला रडू कोसळत आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला असून, वडिलांच्या आठवणीने चिमुरडी रडत आहे. बाबा, तुम्ही लवकर घरी या, अशी आर्त साद घातल्याचे पाहायला मिळत आहे. मुलीच्या या निरागस सादेमुळे आजूबाजूला असलेल्या उपस्थितांचे डोळेही नकळत पाणावले.

राकेश्वर सिंह मनहास यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या वाटेकडे डोळे लागले आहेत. जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे. राकेश्वर सिंह मनहास यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पतीला सुरक्षित परत आणण्याची कळकळीची विनंती केल्याचे समजते. राकेश्वर सिंह मनहास हे सीमा सुरक्षा दलातील एक जवान असून, काही अधिकारी त्यांच्या घरी कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेले होते. मनहास हे नक्षलवाद्यांच्या तावडीत असल्याची माहिती मिळाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.