पहिली ते बारावीपर्यंत कला शिक्षण ‘कम्पल्सरी’

“सीबीएसई’चा निर्णय : संगीत, नृत्य, नाटकाचे शिक्षण

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कला शिक्षणामध्ये संगीत, नृत्य, नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश करण्यात आला आहे. “सीबीएसई’ने कला शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

शिक्षण क्षेत्रातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी “सीबीएसई’ने संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये कला महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्याचा समावेश शिक्षणामध्ये करणे योग्य असेल, असा विचार पुढे आला. त्यातून कला शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

कला शिक्षणामध्ये सीबीएसईने चार प्रकारांना प्राधान्य दिले आहे. त्यात संगीत, नृत्य, दृश्‍यकला आणि नाटक यांचा समावेश आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाककलेचीही ओळख करून द्यावी, असे सीबीएसईने स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक खाद्या, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते, शेतीची योग्य पद्धत या विषयीही माहिती मिळेल. तसेच विद्याथ्रयांना विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यासंस्कृतीचीही ओळख होईल, असे “सीबीएसई’चे म्हणणे आहे.

कला शिक्षणाचा भाग म्हणून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाककलेसाठी काही वर्ग घेण्यात यावेत. त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रमाण सारखेच असावे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्यासही हरकत नाही. मात्र, शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे वर्ग समावेशक, संवादी आणि प्रयोगशील असावेत, असेही “सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे.

येत्या वर्षापासून अंमलबजावणी
सीबीएसईद्वारे कला शिक्षण बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच करण्यात येईल. त्यामुळे शाळांनी दर आठवड्याला किमान दोन तास कला शिक्षणासाठी देणे आवश्‍यक आहे. कला शिक्षणाची परीक्षा होणार नसून, तर वर्षभरातील एकूण प्रक्रियेवर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. त्यात विद्याथ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जातील, तर कलांची मुलभूत ओळख करून दिली जाणार असल्याचे “सीबीएसई’ने सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.