महाबळेश्‍वरच्या विश्रामगृहावरील ओली पार्टी वादाच्या भोवऱ्यात

-महाबळेश्‍वरच्या विश्रामगृहावरील डी. जे. लावून नाचवल्या होत्या नृत्यांगना
-चौकशी सुरू झाल्याने अभियंते, ठेकेदारांचे धाबे दणाणले 

महाबळेश्‍वर- लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजभवन विश्रामगृहावर अभियंता व ठेकेदार यांनी केलेली ओली पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभियंते आणि ठेकदार यांनी पार्टीसाठी डी. जे. लावून नृत्यांगना नाचवल्याने या प्रकाराची गंभीर दखल वरीष्ठ पातळीवर घेत उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. यामुळे उपस्थित अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.

मार्च एंडचा शिणवटा घालवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता आणि त्यांच्या मर्जीतील काही ठेकेदार यांनी महाबळेश्‍वर येथील राजभवन विश्रामगृहावर ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. निवडणुकीची आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशामुळे विश्रामगृहावर शुकशुकाट असल्याचा फायदा घेण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले. ही पार्टी 3 व 4 एप्रिलला पार पडली. अभियंता राठोड व त्यांच्या बरोबर चौघांनी विश्रामगृहातील सुट क्र. 15 च्या समोर बसून रात्री पार्टी केली. याच सुटमध्ये डी. जे. लावण्यात आला होता. त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून सर्व दरवाजे बंद केले.

येथे खास लोकांनाच परवानगी दिली होती. पार्टीसाठी पुण्यातून बारबाला मागवल्या होत्या. त्यांच्याबरोबर अभियंता आणि ठेकदार यांनी डी. जे. च्या तालावर बेफाम नृत्य केले. आचारसंहिता आणि जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून अधिकाराचा गैरवापर करत केलेली पार्टी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पार्टीतील डी. जे. चा आवाज राठोड यांच्या हितचिंतकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कानावर घातला. त्यामुळे या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे.

पुढील महिन्यात राज्यपाल सी. विद्यासागर हे महाबळेश्‍वर येथील राजभवन येथे विश्रांतीसाठी येत आहे. अशाच वातावरणात येथे बारबालांबरोबर झालेल्या पार्टीची गांभीर्याने चौकशी सुरू झाली आहे. राजभवन येथील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. परंतु, ज्या सुटमध्ये पार्टी झाली त्या परिसरात सीसीटिव्ही नाही. त्यामुळे ही पार्टी सीसीटिव्हीमध्ये दिसेल की नाही याबाबत शंका आहे.

तरीही परीसरातील फुटेज तपासले जावून चौकशी केली जाणार आहे. या पार्टीच्या चौकशीसाठी एक पथक महाबळेश्‍वर येथील राजभवनाच्या विश्रामगृहावर येवून गेल्याची माहीती मिळत आहे. पथकाने राजभवन परीसारतील दोन दिवसांचे सर्व सीसीटिव्हि फुटेज ताब्यात घेतले आहे. दुसरे पथक लवकरच महाबळेश्‍वरात चौकशीसाठी येत आहे. पार्टीची माहीती कोणी पथकातील अधिकारी यांना देवू नये, यासाठी दोन दिवस शाखा अभियंता महाबळेश्‍वर येथे मुक्कामी होते.पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता कोणताही प्रकार येथे घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, प्रत्यक्षदर्शी मात्र पार्टीचे रसभरीत वर्णन करत आहेत. याप्रकरणी कारवाई होणार की चौकशी पथकाला मॅनेज करण्यात अभियंता यशस्वी होणार सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष लागून राहीले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.