पाटण तालुक्‍यात वणव्यामुळे वनसंपत्तीचे नुकसान

अमोल चव्हाण

ढेबेवाडी – पाटण तालुक्‍यातील जंगलामध्ये अनेक ठिकाणी वनव्यांमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे जिवंत दृश्‍य दिसून येत आहेत. या तालुक्‍यात गवताची राने पेटविणाऱ्यांवर नियंत्रणाची गरज असून कराड व पाटण तालुक्‍यातील डोंगरांमध्ये अनेक ठिकाणी वनव्यामुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे जिवंत दृश्‍य दिसून येत आहेत. डोंगरांना आग लागण्याच्या घटना सतत घडत असतानासुद्धा वनविभागाचे कर्मचारी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडून वणवा नियंत्रित करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. आठ-आठ दिवस डोंगर जळत असताना कोठेही आग विजविण्यासाठी प्रयत्न दिसत नाही. तर दुसरीकडे वनव्यामुळे लाख मोलाची वृक्षसंपत्ती आणि तृणभक्षी वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडण्यासाठी हे वणवे कारणीभूत ठरत आहेत.

पाटण तालुक्‍यात लोकसंख्येचे घनत्व कमी आहे. या तालुक्‍याला निसर्गाने अनमोल संपत्तीच्या रूपात कोयना धरण, वाल्मिक पठार, डोंगर, नद्या, जंगले, वन्यपशू, पक्षी, तलाव, झरे, दऱ्या इत्यादी वरदान स्वरूपात दिले आहे. परंतु ही संपत्ती योग्यप्रकारे संरक्षण केली जात नाही. शासनाने ज्या लोकांना नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणाची मोठी जबाबदारी दिली. तो वन विभाग आपल्या कर्तव्याचे योग्य पालन न करता किंवा त्यांना जनतेचे योग्य सहकार्य लाभत नसल्यामुळे यंत्रणा नेहमी अपयशी ठरत आहे. हे या तालुक्‍याचे दुर्भाग्यच मानावे लागेल.

दरवर्षी पानगडीचा मोसम सुरू होताच जंगलातील झाडांची पाने गडून खाली पडतात. हळूहळू झाडांची सर्व पाने खाली पडतात आणि पालापाचोळ्याचा एक जाड थर जमिनीवर बनतो. एवढ्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होत असल्याने जमिनीवर पडलेला पाळापाचोळा वाळतो. आणि हा परिसर गवताळ असल्याने या गवताळ प्रदेशांना आग लागली की, संपूर्ण जंगल परिसरात वणवा भयावह रूप धारण करतो. त्यात पालापाचोळ्यासह किमती लाकूडसुद्धा जळून खाक होतात तसेच पालापाचोळ्याखाली असलेले अनेक छोटेमोठे कीटक, साप व इतर शेकडो प्रकारचे सरपटणारे जीवसुद्धा आगीत होरपळून मरतात. एकदा वणवा लागला की संपूर्ण जंगल परिसर व उंच डोंगरापर्यंत वणवा भयावह रूप घेतो. त्यामुळे डोंगरावरीलसुद्धा किमती वृक्ष व प्राणी धोक्‍यात येतात.

वन्यप्राण्यांचे गावाकडे स्थलांतर

जंगलांना लागणाऱ्या वणव्यामुळे जंगलातील अनेक छोटे मोठे वन्यप्राण्यांसह कृमी, कीटक जळून खाक होत आहेत. तर बहुतांश वेळा वन्यप्राणी या वणव्याच्या भीतीने नजीकच्या गावात शिरतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला धोका पोहचत असतो.

पानगडी ओसरल्यावर वसंत ऋतूमध्ये सर्व छोट्या मोठ्या झाडांना नवीन पालवी व पाने फुटतात. ही हिरवळ वनस्पती तृणभक्षी प्राण्यांसाठी आवडता आहार असते. परंतु वणव्यामुळे जमिनीवरील सर्व हिरवे गवत, पालवी, पानेसुद्धा जळून जातात. तसेच वणव्याचा भडका उंच झाडापर्यंत पोहोचल्याने झाडांची पानेसुद्धा जळून पडतात. त्यामुळे वाघ, सांभार, डुक्कर, ससा, सालिंदर, रानगवे व इतर तृणभक्षी प्राण्यांचे आहार नष्ट होते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्याचे जंगलातून पलायन होते. व हे प्राणी अन्न साखळी नष्ट झाल्याने लोकवस्तीकडे येतात.

बिबट्या सारखे हिंस्र प्राणी, पाळीव प्राण्यांवरती हल्ले करतात. कधी कधी ते प्राणीसुद्धा वणव्याच्या जाळ्यात येतात. आणि जीव गमावून बसतात. वनव्यामुळे पक्ष्यांची घरटी व त्यातील अंडी, पिल्लेसुद्धा नष्ट होतात. एकंदरीत वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी संपत्तीची हानी होते. तालुक्‍यात ढेबेवाडी, जिंती, वाल्मिक आणि कोयना परिसरात मोठ्या प्रमाणावर घनदाट वनांनी वेढलेले क्षेत्र आहे. यात इमारती लाकूड, औषधीय गुणांनी भरपूर वृक्ष, फळदार वृक्ष तसेच विविध प्रकारच्या फर्निचरसाठी उपयोगी किमती लाकूड देणारे वृक्ष भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच तृणभक्षी व हिंस्र प्राण्यांचेही विचरण या जंगलात असते. तालुक्‍यासाठी ही एक मोठ्या अभिमानाची बाब आहे. परंतु दरवर्षी वणव्यामुळे लाखोंची वनसंपत्ती नष्ट होते हे वास्तव आहे. वणवा कशामुळे लागतो?

तालुक्‍यामधील बहुतांश गावे डोंगरांमध्ये आहेत आणि या भागातील लोक फेब्रुवारी, मार्चमध्ये शेतातील पालापाचोळा, चराऊ गवताळ प्रदेश पेटवतात आणि ही आग परिसरापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण जंगलात पसरून वणव्याचे रुप धारण करते. जंगलात वावरणारे काही लोक बिड्या ओढतात, बिड्या सुलगवतात. जळत असलेली आगपेटीची कांडी जंगलात फेकतात किंवा जळत असलेली बिडी अर्धवट पिऊन जंगलात फेकतात. त्यामुळेही जंगलात वणवा लागतो. बांबूच्या रांझ्या एकमेकांना रगडत असताना सुद्धा आग निर्माण होण्याची शक्‍यता असते. परंतु असे क्वचितच होते. अधिक तर डोंगरांना लागलेली आग ही जंगलासाठी दयादृष्टी न दाखविणाऱ्या लोकांमुळेच लागत असते. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असून वनविभागाने यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निसर्गप्रेंमीमधून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.