पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांत रविवारी दिवसभरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पाऊस कधी दाखल होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता मान्सूनचे आगमन झाले असून, सलग दुसऱ्या दिवशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
रविवारी दिवसभरात खडकवासला धरण परिसरात 7 मिमी, पानशेतमध्ये 9 मिमी, वरसगाव धरणात 12 मिमी आणि टेमघर धरणात 15 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. दि. 1 जूनपासून दि.25 जूनपर्यंत खडकवासला धरणात एकूण 48 मिमी पाऊस पडला आहे. तर पानशेतमध्ये 74 मिमी, वरसगाव धरणात 86 मिमी आणि टेमघर धरणात 79 मिमी पाऊस पडला आहे.
सध्या खडकवासला धरणात 0.90 टीएमसी म्हणजे 46 टक्के पाणीसाठा आहे. तर पानशेतमध्ये 1.35 टीएमसी म्हणजे 12.71 टक्के, वरसगावमध्ये 14.42 टक्के म्हणजे 14.42 टक्के आणि टेमघरमध्ये 0.10 टीएमसी म्हणजे 2.60 टक्के इतका पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 1.24 टीएमसी जादा पाणी आहे.